Ahilyanagar News : जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारी दवाखाना, बसस्थानकाची अचानक पाहणी ! अधिकऱ्यांना सुनावले खडे बोल

विनोद पुंड
2 Min Read

Ahilyanagar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खात्यांना शंभर दिवसांचा कृती आराखडा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी जामखेडला भेट देत शासनाच्या विविध विकास कामांची पहाणी केली. मोठ्या प्रमाणावर त्रुटी व अस्वच्छतेबाबत संबधित विभागांना खडे बोल सुनावले. यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार उपस्थित होते.

नगरपरिषद इमारत, वाचनालय, सभागृह याची पाहणी केली. तसेच समोरील नागेश्वर नदीचे सुशोभीकरण करा, तुळजापूर जगदंबा देवीची पालखी या नदीतून जाते तेथे लोखंडी पूल बसवा, याचे अंदाजपत्रक तयार करून नगरोत्थानला सादर करा असे निर्देश नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे यांना दिले. तसेच सध्याच्या सरकारी दवाखान्यासाठी सहा महिन्याकरीता भाडेकरारावर जागा पहा असे निर्देश दिले.यानंतर जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी रखडलेल्या बसस्थानकाची पाहणी केली.

बसस्थानक डिझाईन व रखडलेले काम, परिसरातील अस्वच्छता व प्रवाशांना होणारा त्रास पाहून आगारप्रमुख प्रमोद जगताप, ठेकेदार व अभियंता यांना चांगलेच धारेवर धरले. दोन दिवसात स्वच्छता, शौचालय व मुतारीसाठी व्यवस्था करण्याचे आदेश आगारप्रमुखाला दिले.

राष्ट्रीय महामार्गाबाबत लवकरच बैठक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास दोन वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. शहरातील खर्डा चौक ते बीड रोड काँर्नर ते विश्व क्रांती तसेच बाजार समितीच्या समोर अशा विविध ठिकाणी काम अर्धवट झाल्याने नागरिक व वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारी दवाखान्यासाठी भाडे तत्वावर इमारत पाहण्याचे निर्देश जामखेड येथील सरकारी दवाखान्याच्या अडचणी माध्यमांनी मांडल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी जुन्या इमारतीतील दवाखान्याची पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शांतीलाल लाड यांना सध्याच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करा तसेच नियोजीत उपजिल्हा रुग्णालयाचा पहिला मजला सहा महिन्यात झाला पाहिजे, नागरिकांच्या रूग्णालयाबाबत अडचणी लक्षात घेऊन रूग्णालयासाठी भाडे तत्त्वावर जागा पाहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Share This Article
५ वर्षांपासून डिजिटल माध्यमात कार्यरत, राजकीय लिखाणात हातखंडा

Home

Video

Money

Join

Place