शहराच्या पाणी पुरवठा योजना व वितरण व्यवस्थेवरील खर्चात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या एकवीस वर्षांपासून पाणीपट्टी वाढवलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न व पाणी योजना आणि वितरण व्यवस्थेवर होणार खर्च यातील तफावत वाढली आहे. परिणामी, पाणी योजनेची वीज बिले देण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. शहराची पाणी पुरवठा योजना व वितरण व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी महापालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठवण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेने सन २००३ मध्ये पाणीपट्टीमध्ये वाढ केली होती. तेव्हापासून अर्धा इंच नळ कनेक्शनसाठी एक हजार पाचशे रूपये दर आकारला जात आहे. शहर पाणी पुरवठा योजनेसह वितरण व्यवस्था चालविण्याकरिता येणारा वीज बिल, दैनदिंन देखभाल व दुरूस्ती, आस्थापना खर्च यात कित्येक पटीने वाढ झाली आहे.
शहरात घरगुती वापर नळ कनेक्शन धारकांची संख्या मोठी असल्याने उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव दरवर्षी मंजुरीसाठी सादर करण्यात येत होते. मात्र निर्णय झाला नव्हता. यापूर्वी महासभेने घरगुती वापर पाणीपट्टी वगळता व्यावसायिक, औद्योगिक वापराच्या पाणी दरात वाढ केली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीत फारसा फरक पडला नाही. याचा विचार करून सन २०२५-२०२६ पासून घरगुती पाणीपट्टीत दरवाढीचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चामुळे पाणीपट्टी वाढवणे गरजेचे असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.
पाणीपट्टी वाढणार, पण किती ? सर्वांचे लागले लक्ष
महापालिकेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे स्थायी समिती आणि महासभा या दोन्ही ठिकाणी अधिकारीच असतात. यापूर्वी राजकीय धोका नको म्हणून लोकनियुक्त बॉडी असे ठराव फेटाळत असे. त्यामुळे पाणी पुरवठा विभाग वर्षानुवर्षे तोट्यात जात आहे. आता प्रशासनच असल्याने महासभेतही ठराव मंजूर होईल. मात्र घरगुती पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याच्या शिफारशीमध्ये काही बदल होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
असे आहेत प्रस्तावित दर
- अर्धा इंच कनेक्शन प्रतिवर्ष तीन हजार रूपये
- पाऊण इंच कनेक्शन: प्रतिवर्ष सहा हजार
- एक इंच कनेक्शन: प्रतिवर्ष १० हजार रुपये
- हद्दीबाहेर मीटरद्वारे पाणी २० रुपये प्रतिहजार लिटर
- शहरात मीटरद्वारे पाणी १० रुपये प्रति हजार लिटर