जिल्हा विभाजनाची २०१६-१७ पासून मागणी करत आहेत. ठाणे जिल्ह्यातून पालघरचे विभाजन झाले. त्याचवेळी अहिल्यानगर जिल्हा विभाजनाची मागणी केली होती. जिल्ह्यातील सर्व धरणे, विमानतळ, शिर्डी-शनिशिंगणापूर देवस्थान उत्तरेत आहे. यामुळे दक्षिण भाग दुर्लक्षित राहिला. विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. कुस्ती स्पर्धेच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यातील मातीपूजन सोहळ्यात सोमवारी ही जुगलबंदी रंगली. आमदार कर्डिले म्हणाले, दक्षिणेवर सातत्याने अन्याय होतो आहे. केंद्र किंवा राज्य सरकारचे सर्व कार्यक्रम शिर्डीत होतात. त्यामुळे शिर्डीत मुख्यमंत्र्यांना सांगितले की असे मोठे कार्यक्रम दक्षिणेत होण्यासाठी साईबाबांचे प्रतिमंदिर नगरमध्ये उभारतो. म्हणजे सर्व राजकीय नेते दर्शनाच्या निमित्ताने दक्षिणेला येतील.
कर्डिले पुढे म्हणाले, कालच्या निवडणुकीत ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. पण राजकारणात कधी कधी असे म्हणावे लागते. सहानुभूती मिळवण्यासाठी डावपेच करावे लागतात. पैलवान कधी कोणावर डाव टाकतील याचा नेम नसतो. जिल्ह्यात सगळे कारखानदार, प्रस्थापित मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर काम करणे आणि राजकारण करणे सोपे नाही. परंतु पैलवानकी कामाला आली. कुस्तीचे काही डाव कामाला आले.
मंत्री मोहोळ यांनीही काढले चिमटे
कुस्ती स्पर्धेची आर्थिक जबाबदारी सोडून कोणतीही द्या, तुम्हाला काही आर्थिकची गरज लागणार नाही. आर्थिकला मी गरीब आहे. मोठ्या प्रमाणात देणे राहिले आहे. ते सोडून काही सहकार्य लागत असेल तर १०० टक्के करू, असे आमदार कर्डिले यांनी आमदार जगताप यांना उद्देशून भाषणात सांगितले. यावर मंत्री मोहोळ म्हणाले, आमच्या भैय्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही बँकेचे चेअरमन आहात. यांनी काही मदत केली नाही तर मला सांगा, माझ्याकडे सहकार खातं आहे आणि जिल्हा बँक आपल्याकडे आहे.