दिवसेंदिवस जमीन आणि तयार घरांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. अशा स्थितीत स्वतःचे घर घ्यायचे म्हटले की, किमती ऐकून अनेकांना घाम फुटतो. मात्र, अशाही स्थितीत अहिल्यानगर शहर आणि परिसरात प्लॉट, फ्लॅट आणि बंगल्यांची जोरदार खरेदी-विक्री होत आहे. नगरकरांची ऐपत वाढली असून, गेल्या वर्षभरात शहरात अनेकांनी अगदी तीन ते चार कोटींपर्यंतच्या फ्लॅटची खरेदी केली असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
सावेडीतील गुलमोहर रोड, मनमाड रोड, पाइपलाइन रोड, सारसनगर, बालिकाश्रम रोड, बोल्हेगाव, केडगाव, तपोवन रोड आदी उपनगरांमध्ये अनेक मोठमोठाले गृहप्रकल्प सुरू आहेत, तर अनेक प्रकल्प तयार आहेत. सावेडीत प्लॉटच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने या भागात अपार्टमेंटचे सर्वाधिक प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ५० लाखांपासून ते तीन चार कोटी रुपयांपर्यंत फ्लॅट आहेत. या प्रकल्पांमध्ये घरखरेदी करणाऱ्यांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही बहुतांशी जण जमिनीवर घर घेण्यापेक्षा फ्लॅटलाच पसंती देत आहेत.
वर्षभरात २७ हजार ६२८ मालमत्तांची खरेदी-विक्री
गेल्या वर्षभरात येथील बस रजिस्टार कार्यालयात एकूण २७ हजार ६२७ दस्त नोंदणी झाली आहे. यामध्ये नगर शहर आणि नगर तालुक्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीचा समावेश आहे. या व्यवहारातून वर्षभरात शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
फ्लॅटसाठी सावेडी तर बंगल्यासाठी उपनगराला पसंती
शहरात सावेडीच्या तुलनेत बोल्हेगाव, केडगाव, तपोवन रोड, कल्याण रोडला घरे स्वस्त आहेत. मात्र, ज्यांना अगदी शहराच्या जवळ घर हवे आहे, असे ग्राहक सावेडी उपनगरात फ्लॅट खरेदीला पसंती देत आहेत तर ज्यांना रो- हाउस, बंगलो, ऐसपैस बंगला घ्यायचा आहे ते पनगराला पसंती देत आहेत. सावेडीच्या तुलनेत उपनगरात फ्लॅटच्याही किमती कमी आहेत.
गृहकर्ज महागले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्याने बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे बजेटही वाढले आहे.